कुमारिकापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे!

शारदीय नवरात्र
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.
आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे.
नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.
अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे.
राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते.
*नवरात्र व्रताचे प्रकार:-
१)प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र
२) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत
३) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत
४) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत

नवरात्रीची अंगे:- नवरात्रीची प्रमुख ४ अंगे
१) देवतास्थापन
२) मालाबंधन
३) नंदादीप(अखंड दीप)
४) कुमारिकापूजन
ही आहेत.
काही जणांकडे वेदिका (शेत) स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत.
नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात.
नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णुसहस्रनाम वाचावे. नवरात्रात मालाबंधन करताना (माळ बांधताना)त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी. कुमारिकापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.

कुमारिकापूजनाचे फळ पुढीलप्रमाणे:–*
१ कुमारिका पूजन- ऐश्वर्यप्राप्ती
२ कुमारिका पूजन– भोग व मोक्ष प्राप्ती
३ कुमारिका पूजन — धर्म व अर्थ प्राप्ती
४ कुमारिका पूजन– राज्यपदप्राप्ती
५ कुमारिका पूजन– विद्या प्राप्ती
६ कुमारिका पूजन– षट् कर्म सिद्धी
७ कुमारिका पूजन—राज्य प्राप्ती
८ कुमारिका पूजन–संपत्ती
९ कुमारिका पूजन–पृथ्वीचे राज्य मिळते.

|| जय श्रीविंध्यावासींनी ||